स्त्रीमुक्ती, महिला संबलीकरण, भारत मागेच..
एकवेळ एक चर्चासत्र भरविला गेला. त्याचा केंद्र विषय होता "स्त्रियांच्या समस्या", चर्चासत्रात झालेल्या भाषणातून एक चांगली माहिती पुढे आली. ज्या ज्या देशांमध्ये स्त्रियांना सर्वार्थानं पुरेपूरे स्वातंत्र्य आहे. अशा देशांची एक यादी वाचून दाखविण्यात आली. हे स्वातंत्र्य सामाजिक, आर्थिक आणि राजकीय इ. बाबतीत होतं. ज्या देशात स्त्री मुक्तीची संकल्पना आघाडी वर आहे अशा देशाचे नाव या यादीत अर्थातच अग्रभागी होते. तर ज्या देशात स्त्रियांच्या सबलीकरणाचे फारसे प्रयत्न झाले नाही त्याचे नाव बरेच खाली होते. भारताचं नाव साधारण मध्य भागी कुठेतरी असेल अशी माझी समजूत होती. पण प्रत्यक्षात लक्षात आला की आपल्या भारताचं नाव या यादीत शेवटून दुसरं होते. ते पाहून मला आश्चर्याचा जोरदार धक्का बसला आणि अतिशय दुःख झाले. या यादीत अग्रभागात कोणत्या देशाची नावे झळकत होती. हे मी उत्सुकतेने पाहू लागलो. मला वाटलं इंग्लंड नाही तर अमेरिकेच नाव पहिल्या तीन क्रमांकात असणार. पण प्रत्यक्षात तसं नव्हतं. पहिल्या तीन क्रमांकाचे देश होते स्वीडन, नार्वे आणि डेन्मार्क. तर हे बघून आम्हाला आश्चर्याचा धक्का बसला. युरोपच्या एका कोपऱ्यात असणारे हे छोटे देश पण त्यांच्या देशातील स्त्रीयांना मात्र सर्वात जास्त आदराने वागवण्यात येते असे दिसून आले.
यत्र नार्यस्तु पुजन्ते रमन्ते तत्र देवताः ज्याक्षणी भारतीय स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळाला तो क्षण म्हणजे समानतेचं खरं प्रतीक ठरलं. पण वास्तविक जगात मात्र स्त्रीयांना समाजात विशेष स्थान नाही. असच दिसतं म्हणून हुंडाबळी, नववधु जाळणे, स्त्री गर्भाची हत्या आणि अशाच स्वरूपाचे गुन्हे समाजात घडत असतांना दिसतात. जरी आपल्या जुन्या ग्रंथात लिहिले आहे की, यत्र नार्यस्तु पुजन्ते रमन्ते तत्र देवताः
स्वीडनच्या राजघराण्यातील नियमानुसार त्या घराण्यात जन्माला आलेल्या पहिल्या अपत्याकडे राज्याधिकार येतो. मग ते अपत्य मुलगा असो किंवा मुलगी. कदाचित हीच पद्धत नार्वेत सुद्धा प्रचलित आहे. या देशांमध्ये स्त्रियांना पुरुषांपेक्षा वेगळी वागणूक देता येत नाही. अन्यथा तो गुन्हा ठरतो. आमच्या एका मैत्रिणीने सांगितले की, मी स्टॉकहोमला असताना एका रात्री मला हॉटेलात परत येण्यास उशीर झाला. हॉटेल बरंच लांब होतं. म्हणून मी टॅक्सी केली. हॉटेलपर्यंतचे भाडे चाळीस क्रोमो इतके होते. पण मला वाटलं एवढी रात्र झाली आहे तेव्हा हा टॅक्सी ड्रायव्हर आपल्याकडून नक्कीच दुप्पट भाडं वसूल करणार म्हणून मी त्याला शंभर क्रोना दिले व तो उरलेले पैसे परत देईल म्हणून थांबले. त्याने मला ऐंशी क्रोना परत दिले. मी त्याला विचारले फक्त वीसच क्रोना झाले? त्यावर तो म्हणाला मॅडम तुम्ही एक स्त्री आहात आणि रात्री एकटी प्रवास करत आहात. त्यामुळे
आम्ही अर्धेच भाडे घेतो. मला ते ऐकून आश्चर्य वाटले. आनंद ही झाला. इकडे आपल्या देशात एवढ्या रात्री स्त्रीयांना प्रवास करण्याचे धारिष्ट्य सुद्धा होणार नाही आणि यदाकदाचित करावा लागला तर टॅक्सी ड्रायव्हर जेव्हढे भाडे होईल त्याच्या पेक्षा जास्तच भाडे वसूल केल्यावाचून राहणार नाही.
आपण आपल्या देशात व्यासपीठावरून भाषण देतो, देवीची आराधना करतो आणि आपल्या राज्यघटनेने स्त्रीयांना पुरुषांच्या बरोबरीने अधिकार दिलेले आहेत. असे आपण मोठ्या अभिमानाने सांगतो. आपले जुने धर्मग्रंथ आणि इतिहासात स्त्रियांचे गुणवर्णन केलेले आहेत. एवढे असतांना आपल्या देशात स्त्रियांना पदोपदी सुरक्षित वाटते का? स्वातंत्र्याचा आनंद त्यांना मुक्तपणे उपभोगायला मिळतो का?
सर्वसाधारणपणे स्त्रियांची ओळख कशी करून देण्यात येते? कोणाची तरी मुलगी, पत्नी किंवा माता म्हणून. अस आढळून आला की बरेचदा स्त्रियांना आपला वैयक्तिक मत देण्याचा मान नसतो. त्यांनी केलेल्या कामाचा कुणाला कौतुक वाटत नाही. कारण त्यांना पुरुष प्रधान समाजात राहावं लागतं. तरी देखील बऱ्याच स्त्रिया आपल्या क्षेत्रात यश संपादन करतात जी लक्षणीय गोष्ट आहे. असे अनेक स्त्रियांचे नावे सांगता येतील. जशी झाशी ची राणी लक्ष्मीबाई, मीराबाई अवकाशात फिरून आलेल्या अनेक स्त्रिया उदाहरणार्थ कल्पना चावला इ.
या उलट त्या तीन स्कँडेनेव्हियन देशात स्त्रियांना अत्यंत सम्मानाची वागणूक मिळते. आपण आपल्या भारत देशात फक्त बोलतो पण ते सुरुवातीपासून अंगवळणीत उतरवून सहज कृतीत आणतात. त्यामुळे "यत्र नार्यस्तु पुजन्ते रमन्ते तत्र देवताः” ही उक्ती त्या देशांमध्ये सार्थ ठरत आहे. म्हणून आपल्या संस्कृत भाषेची ही उक्ती आपल्या देशात कृर्तत राहिली पाहिजे हे सिद्ध करूया.
by:
मनोहर गोविंद उरकुडे
- नागपूर (महाराष्ट्र)