माझी हिरकणी : शुरवीर ठरली

नवरा दारुडा, रात्रंदिवस दारू पिऊन घरात पडलेला. | संसार चालविण्यासाठी ती नोकरी करायची. बाळाला दुध पाजायची, नवरा बाळाच्या दुधासाठी ठेवलेले पैसेही चोरून नेवून दारू पित होता. रात्रंदिवस कष्ट करायची त्या पैशातून दोन वेळेच्या जेवणाची सोय होत असे. अशी ही हिरकणी ज्येष्ठ ठरली आहे. संसारासाठी एक मायमाऊली अग्नीदिव्य करू शकते. जोपर्यंत आई आहे तोपर्यंत कुटुंब सुरक्षित आहे. हिरकणीने कॅन्सरवर संघर्ष करून त्यावर विजय मिळविला.

महान शिवाजीराजे यांच्या कार्यकीर्दीत घडलेली ही सत्यकथा सर्वांनाच माहिती आहे. तान्ह्या बाळाला पाळण्यात झोपवून दाराला कडी लावून एक मायमाऊली गडावर दुध विकण्याकरीता गेली. परत येतांना संध्याकाळ झाली. गडावरील नियमाप्रमाणे गड दरवाजे बंद झाले. शिपायांना विनवणी करून उपयोग झाला नाही. तेव्हा ती रात्रीच्या अंधारात पायी गड उतरली वाटेत काटे, दगड, धोडे, साप, विंचू वन्यप्राणी या सगळ्यांची भीती न बाळगता आपल्या जीवाची पर्वा न करता तान्ह्या लेकराच्या चिंतेने हे एवढे मोठे धाडस करून अमर झाली. शेवटी गडावरून घरी आली. त्या करुणाला शिवरायाने तिच्या नावाने हिरकणी बुरुज नाव ठेवले,

प्रत्येक माऊलीमध्ये हिरकणी आहे. आणि ती आपल्या लेकरासाठी कोणतेही अग्निदिव्य करू शकते. तिची अनेक रूप आहेत. ती परिस्थितीशी "लढण्यासाठी स्वयंपाक घरातील वस्तूंचा शस्त्रासारखा उपयोग करून घरावर चालून आलेल्या संकटाशी, शत्रुशी, महाकाली होऊन निकराने लढा देऊ शकते. अशाच एका रणरागीणीची ही कथा आणि व्यथा आहे. जिने कॅन्सरसारख्या रोगांवर मात करून आपला संसार, नोकरी सांभाळली आहे. घरात व्यसनी दारुडा नवरा आणि सासर सुनेला एक मोलकरीन समजणारे होते. मंजुषाचा शारीरिक व मानसिक छळ होत होता, तिच्या सुख दुःखाशी, भावनाशी त्यांचे काही देणे घेणे नव्हते. ती नगर परिषद दवाखान्यात नर्स होती. नगरधन सारख्या खेड्यात झोपडी बजा मातीचे कौलारू घर होते. घरातील सर्व कामे सडा सारवण, भांडे, धुणी, स्वयंपाक करून ती रामटेकला नोकरीवर जायची. एक लक्ष्मणसारखा छोटा दिर होता तो वहीणीला बहीणीसमान मानायचा जमेल ती मदत करायचा, गरोदर असतांना डिलीव्हरीसाठी सुटी घेतली. दुसऱ्याच दिवशी घरी कोणी नसतांना स्वतःची डीलीव्हरी टॉयलेट मध्ये स्वतःच्या हाताने केली. लहानशा दिराला ब्लेड व दोरा गरम पाण्यात उकळवायला लावून नाळ कापले. दोऱ्याने बांधले. बाळाला घेऊन घरात आली. काहीच सोय नाही. घरातील सर्व कामे करायची. जे मिळेल ते खायची आपली भूक भागवून लेकराला दुध पाजायची. बांग्याची भाजी असल्यास पाण्यात भिजवून पोळी भात खायची. अशी हलाखीची परिस्थिती होती. सुटी संपल्यावर नौकरीवर रुजू झाली. लहानशा लेकराकडे बघायला रात्र पाळीमध्ये नवरा दररोज १०० रुपये मागायचा. दारू पिऊन पडून राहायचा. लेकरासाठी आणून ठेवलेले दूध त्याला पाजायची शुद्ध त्याला नसे. पाळण्यात लेकरू रडून रडून झोपी जायचे. थोडा मोठा झाल्यावर दुधाच्या मांड्यापर्यंत लेकरू जावून ते पिण्याचा प्रयत्न करायचा. कधी धक्का लागून ते सांडून जायचे. लेकरू पाणी पिऊनच आईची रात्रभर वाट पाहून झोपी जायचे. मंजुषाचे लक्ष सर्व घराकडे असायचे. ड्युटी संपली की जे मिळेल त्या वाहनाने ती धावतच घरी यायची. लेकराला जवळ घेऊन, कुबाळून दुध पाजायची. स्वतः रडायची. पण नाईलाज होता. संसाराच्या खर्चासाठी नोकरी करणे गरजेचे होते.

देवाला इतकी हाल अपेष्टा बघून सुद्धा किव आली नाही. व्यसनी नवऱ्याला पत्नी एक उपभोग्य वस्तु वाटायची. सहा वर्षात तीन मुले झाली. मोठा मुलगा लहान मुलांना सांभाळायचा. जमेल तशी आईला कामात मदत करायचा, पण देवाला आणि दैवाला ते सुद्धा पाहवले नाही. मंजुषाला कॅन्सर झाला. ती स्वतःच नागपूरला जाऊन औषधोपचार करायची. शेवटी ऑपरेशन झाले. पाठीला बांधलेले पोटाला चिमटा घेऊन जमवलेले सर्व पैसे खर्च झाले. सुटी घेतली, पगार नाही. घरी खायला काही नाही. तुकडोजी कॅन्सर दवाखान्यात एकटीच इंजेक्शन घ्यायला जायची. घरी येऊन सर्व कामे करायची. केस जाऊन टक्कल पडले. चेहरा काळा पडला. नवरा राग राग करायचा. पण मंजुषा डगमगली नाही. हिरकणीप्रमाणे संसारातील खाच खळगे, दगड धोंडे, साप, विंचू, समाजातील विकृत पुरुष यांचा हिंमतीने सामना करून संसाराचा गड चढली, लेकरांची काळजी घेऊन त्यांना शिक्षण देऊन मोठे केले. आज ते चांगल्या नौकरीवर आहेत. तात्पर्य, एक माय माऊलीच हे अग्निदिव्य करू शकते. प्रत्येक युगात हिरकणी आहे. जोपर्यंत आई आहे. तोपर्यंत कुटुंब सुरक्षित आहे, अशी माझी मंजुषा कॅन्सरला लात मारून आनंदाने जगत आहे.

by:
सौ. सुनिता मेंडुलकर

- वरोरा, जि. चंद्रपूर.

Comments (0)

You must login to post comments!