आईची माया धरणीपेक्षाही मोठी पण बापाचे स्थान आभाळापेक्षाही उंच!

आईची माया मोठी, आई प्रेमळ, आई महान पण तुमचा बापही तुमच्यासाठी महान आहे. बापाचे स्थान आभाळापेक्षाही उंच उंच आहे. कुटुंबात सर्वांची काळजी बापच घेतो. तो आयुष्यभर धान्याच्या बैलाप्रमाणे कुटुंबासाठी राबराबत असतो मग म्हातारपणी त्याला एकटे पाडू नका त्यांची तुम्ही काळजी घ्या. त्यांचा आधार बना त्याला वृद्धाश्रमाची वाट दाखवू नका, म्हाताऱ्या बापाला कधीतरी प्रेमाने मिठी मारून त्याचेही दुःख जाणून घ्या. सर्वांनी फक्त आई महान असेच म्हटले आहे. पण बिचाऱ्या बापाकडे दुर्लक्ष केले आहे. त्याला महान म्हणा.

आई घरातील नियम तर बाप घरातील नेतृत्व असते. आई मायेचा वत्सल वृक्ष तर दुसरा बाप त्या वृक्षाला फुलवून बहरायला लावणारा कर्तव्यनिष्ट करुणासागर असतो. म्हणूनच जेवढी ज्येष्ठ आई तेवढाच बापही महान असतो. त्याची महानता विसरू नका. त्याला एकाकी पाहू नका, मातृ देवो भव, पितृ देवो भव, ही भारताची संस्कृती आहे. आई ही मुलांचा पहिला गुरू आहे. आई ही मुलाशी एकरूप होते. मुलगा सुद्धा आईशी एकरूप होतो. नंतर ओळख होते ती बापाची. बाप घरासाठी, मुलांसाठी अपार कष्ट करतो. परंतु आजची सर्वत्र आईची थोरवी गायीली जाते. बापाला आपण विसरलो की काय? असे वाटते. "आई थोर तुझे उपकार आई थोर तुझे उपकार" असे म्हटले जाते. पण बाबा थोर तुमचे उपकार असे म्हटले जात नाही. जगातल्या सर्व लेखकांनी आणि कवींनी आईचेच गुणगाण केले आहे. बापाकडे मात्र सर्वांनी दुर्लक्षित केले आहे. परंतु आईला आईपण देणारा बापच असतो. बाप होता म्हणून मुलं एवढी शिकली, मोठी झाली. हे विसरून चालणार नाही.

किशोरावस्थेपासून तर आयुष्याचा पुढचा प्रवास बापाचे बोट धरूनच पूर्ण करावा लागतो. आई घर अनुभवते तर बाप मुलाला जगातील माहिती देते. आर्थिक व्यवहार कसे करायचे हे बापच सांगतो. चारचौघात कसे वावरायचे हे बापच सांगतो.. शिकवितो. तरी बाप मात्र पूर्ण दुर्लक्षित आहे. बाप रात्रंदिवस कष्ट करतो. तो स्वतः कधी रडत नाही. कारण आपण रडलो तर संपूर्ण घर रडेल, सर्व खचुन जाईल. ही त्याला भीती वाटते. रडला तर एकांतात रडतो. घरातील सर्वात सांत्वन करता करता तो स्वतःचे दुखणे विसरतो. घरात सर्वांना कपडे आणता आणता स्वतः मात्र फाटली बनियन घालतो. त्याची चड्डी फाटली असते. बापाला जीवनात किती ओढाताण करावी लागते हे प्रत्येक बापालाच विचारा. जिजाबाईनी शिवरायांना घडविले हे जरी खरे असले तरी त्यासाठी शहाजी महाराजांनीही त्यांच्या जीवनात किती किती ओढाताण सहन करावी लागते. श्रीकृष्णाच्या देवकी आणि यशोदा या आयाबद्दल सर्वांना माहिती आहे. परंतु पुराच्या पाण्यातून बालकृष्णाला डोक्यावर घेऊन जाणाऱ्या वासुदेवाला आपण विसरलो, बापाला कुटुंबातील सर्वांची काळजी घ्यावी लागते. तो कधीही भेदभाव करीत नाही. सर्वांच्या सुखासाठी झटतो. प्रसंगी झगडतो पण वाटेल तो आनंद मिळवून देतो आपल्या कुटुंबाला बापच.

म्हातारपणी बापाला सांभाळा. त्याची हेळसांड करू नको. त्याला वृद्धाश्रमात टाकू नका त्याच्याही भावनाची कदर करा. वृद्धावस्थेत मुलांनी प्रसंगी मुलीनी बापाची काठी बनून सोबत द्यावी अनेक उच्चशिक्षित मुल बापाला वृद्धाश्रमात टाकून देतात आणि आपली जबाबदारी संपली असे समजतात. पण असं करू नका, अनेक ठिकाणी दोन तीन मुले असतांना सुद्धा बापाला कुणी बागवायला तयार नाही, असे करू नका, बापाला सांभाळा, त्याचे उपकार विसरू नका.

Comments (0)

You must login to post comments!