घरातील सोने-चांदी, रत्ने, हिरे विकणार असाल तर 20 टक्के टॅक्स भरावा लागणार..
तुमच्या घरातील वडिलोपार्जित फार पूर्वी घेतलेले सोने-चांदी, रत्ने, हिरे सराफा बाजारात जाऊन विकणार असाल तर त्यातून आलेल्या नफ्यावर तुम्हाला आता २० टक्के प्राप्तीकर (आयकर) भरावा लागणार आहे. यापूर्वी संपत्तीच्या विक्रीतून होणाऱ्या नफ्यावर २० टक्के टॅक्स भरावा लागत होता. परंतु सरकारने तोच नियम आता घरातील सोने, चांदी, रत्ने, हिरे, मोती यांच्या विक्रीवर लावला आहे.
प्राप्तीकर कायद्यानुसार घरात वापर होणाऱ्या वस्तुच्या विक्रीतून झालेला नफा करमुक्त होता. आपल्या घरातील अनेक वस्तूंपैकी काही वापरात असतात तर काही नसतात. जुनी भांडी, कपडे, उपकरणे, अवजारे कपाट, टेबल इत्यादी वस्तु विकल्यात तर त्याची अतिशय कमी किंमत येते. त्यावर मात्र कोणताही टॅक्स पडणार नाही. या वस्तुच्या विक्रीतून कोणताही नफा होत नाही. मात्र ज्या वस्तुच्या किंवा स्थावर मालमत्तेच्या विक्रीतून तुम्हाला नफा झाला तर २० टक्के प्राप्तीकर भरावा लागेल. आपण एखादा जुना प्लॉट विकला तर त्यावर जो काही नफा होईल त्यावर २० टक्के प्राप्तीकर भरावाच लागेल. उदा. तुम्ही एखादा प्लॉट किंवा फ्लॅट १० लाखाला घेतला. आज त्याची किंमत ४० लाख आहे तर येणारा ३० लाख हा तुमचा नफा होय या तीस लाखावर २० टक्के दराने तुम्हाला आयकर भरावाच लागेल, असे सरकारने एका पत्रकात म्हटले आहे.
सोन्याचे दागिणे, चांदीचे दागिणे, पुरातन नाणी व जुन्या वस्तु, जुनी पेंटींग्स, देवाच्या खुप जुन्या मूर्ती इत्यादी वस्तु आजच्या भावाने विकल्या तर खुपच चांगली किंमत येते. यावर मिळणाऱ्या नफ्यावर तुम्हाला २० टक्के टॅक्स भरावाच लागेल. उदा. सोन्याच्या पाच तोळ्याच्या बांगड्या तुम्ही १० वर्षापूर्वी केल्या आणि आज सराफात विकल्या तर त्यावर मिळणाऱ्या नफ्यावर तुम्हाला २० टक्के टॅक्स भरावाच लागेल. या वस्तुवर झालेला नफा करपात्र भांडवली नफा धरला जातो. यावर प्राप्तीकर २० टक्के दराने भरावा लागतो. यासाठी भांडवली नफा काढताना वस्तुच्या विक्रीच्या रक्कमेतून खरेदीची महागाई निर्देशित रक्कम धरली जाते. जुन्या वस्तुचा संग्रह करणारे किंमत देऊन त्या वस्तु विकत घेतात. अशावेळी भांडवली नफ्यावर २० टक्के प्राप्तीकर भरावाच लागतो.
सोने, सोन्याचे दागिने प्रत्येकाच्या घरात सोने व सोन्याचे दागिने असतातच. शक्यतो आपण सोने विकत नाही. परंतु जुने दागिने मोडून नवीन करतो. अशा वेळी ज्वेलर्स जुन्या दागिन्याची खरेदी केली असे दाखवतात व ते पैसे नवीन दागिन्यांसमोर जमा केले असेही दाखवतात. अशा वेळी जुन्या दागिन्यांच्या विक्रीवर भांडवली नफा काढून त्यावर प्राप्तिकर भरावा लागतो. प्रत्यक्षात ही रक्कम मोठी नसते. त्यामुळे बरेचजण तो विवरणपत्रात दाखवत नाहीत. परंतु कायद्यानुसार हे करपात्र उत्पन्न धरले जाते.
वारसा हक्काने मिळालेले सोने व चांदीचे दागिने विकले तरी भांडवली नफा करपात्र धरला जातो. यासाठी मात्र आई-वडील किंवा आजोबा आजी यांची दागिन्यांच्या खरेदीची किंमत आपण विक्रीच्या किंमतीतून वजा करू शकतो. जर दागिने किंवा वस्तू १ एप्रिल २००१पूर्वी कधीही खरेदी केली असेल, तर १ एप्रिल २००१ या दिवशीची सोन्याची बाजारातील किंमत ही जणू खरेदीची किंमत आहे. असे मानून भांडवली नफा काढता येतो. २००१ पासून विक्री होईपर्यंत महागाई निर्देशांक वापरून खरेदीची ही किंमत वाढवता येते व भांडवली नफा कमी करता येतो. हाच नियम सोन्याव्यतिरिक्त इतर वस्तूंनाही लागू होतो. सोने विक्री करताना मोठी रक्कम मिळणार असेल व भांडवली नफा होणार असेल, तर मिळणारी रक्कम नवीन घरात गुंतून कलम ५४एफ अंतर्गत वजावट घेऊ शकतो. यासाठी सोने विक्री करणाऱ्याच्या नावे एकापेक्षा अधिक निवासी घरे असता कामा नयेत.
घर बदलताना...
बरेच वेळा घर बदलताना जुन्या घरातील वस्तूंची विक्री केली जाते. अशा वेळी अपवाद सोडून इतर वस्तूंच्या विक्रीवर प्राप्तिकर लागत नाही. काही ठिकाणी घर विक्री करताना करारात घराची किंमत व वस्तूंची किंमत स्वतंत्र दाखवली जाते. घर विक्री व्यवहार हा करपात्र आहे. परंतु वस्तू विक्री करमुक्त असते. अशा वेळी प्राप्तिकर खाते या वस्तूंच्या खरेदीविषयी विचारणा करून खरोखरच या वस्तू विकल्या, की घरखरेदीची किंमत कमी दाखवण्यासाठी चलाखी केली हे समजून घेते. अशा वेळी वस्तूच्या खरेदीच्या पावत्या व पुरावे असले तरच करारात तसा उल्लेख करणे योग्य ठरते.