आठवणीतील गणेश चतुर्थी
श्रावण महिना संपला की वेध लागतात ते गणेशोत्सवाचे आमचे येथे फार पूर्वीपासून गणपती बसतो तेही १० दिवसांचा गणेश चतुर्थी स्थापना करायची व अनंत चतुर्दशीला विसर्जन करायचे माझ्या अंदाजाप्रमाणे बहुतेक १९५६-५७ पासुन आमचेकडे गणपती बसतो आहे. कधी काही खंड पडला नाही पण १९७५ ची गणेश चतुर्थी मला अजुनही स्मरणात आहे. यावेळी मी १९ वर्षांचा होतो अगदी गणेश चतुर्थीच्या आठ दिवस आधी आम्ही पाचही भावंड (२ बहिणी व ३ भाऊ) अचानक आजारी पडलो परिस्थिती अत्यंत नाजूक होती पण इकडून तिकडून उधार उसनवारी करून वैद्यकीय खर्च करावा लागला. त्यामुळे यावर्षी गणपती बसवायचा नाही असे माझ्या बाबांनी ठरविले साहजिकच मग काही तयारी पण केली नव्हती. आम्ही सगळे भावड, सर्व काका लोक एकत्र राहात होतो. सगळी चुलत भाऊ व बहिणी मिळून आम्ही २२ बहिणी व ११ भाऊ होतो माझ्या वडिलांना काकांची संख्या जास्त होती त्यामुळे आम्हीपण आमच्या वडिलांना काकाच म्हणायचो..
गणपती बसायला म्हणजेच गणेश चतुर्थीला एकच दिवस शिल्लक होता. पण वडिलांनी ठरविले होते की यावेळी पैशाची अडचण असल्यामुळे गणपती बसवायचा नाही. त्यामुळे काहीच तयारी केली नव्हती संध्याकाळी माझा चुलत मोठा भाऊ दिवंगत सुरेंद्र देशकर माझ्या वडिलाना म्हणाला, काका उद्या गणेश चतुर्थी आहे आणि तुम्ही काहीच तयारी केली नाही. वेळेवर काय काय कराल माझे बाबा म्हणाले, नाही. यावेळी मी काही गणपती बसवणार नाही आहे पैशाची फारच अडचण आहे. होते नव्हते सगळे पैसे मुलांच्या आजारपणात खर्च झाले पण पुढल्या वर्षी मात्र मी नक्की गणपती बसवणार, बावर्षी नाही. त्यावर दिवंगत (सुट्ट भाऊ) (सुरेंद्र, आम्ही त्याला सुट्ट भाऊ म्हणायच) म्हणाला 'काका अस करू नका, खंड पाडू नका, मी तुम्हाला १० (द रूपये) देतो, ते घ्या आणि गणपती बसवा.
त्यावेळेस म्हणजे १९७४-७५ मध्ये पाच रुपयामध्ये चांगला गणपती मिळायचा व ५ रूपयामध्ये बाकीचे सामान व्हायचे जसे की हार, फुल, जाणवे नारळ, सव्वा रुपयाचे प्रसादाचे पेढे, गोफ, कमळाचे फुल, नारळ, केळी, विड्याचे पान, सुपारी, सगळे होऊन जायचे माझे वडिल एकदम तयार नाही झाले पण घरातील इतर वयस्कर मंडळीनी आग्रह केला त्यामुळे माझ्या बाबांनी माझ्या चुलत भावाकडून (दिवंगत सुरेंद्र देशकर) १० रुपये घेण्यास होकार दिला.
दुसऱ्या दिवशी म्हणजे गणेश चतुर्थीच्या दिवशी माझ्या बाबांनी मला पण सोबत घेतले व आम्ही सकाळी ८ वाजता महाल वरील कोतवाली पोलीस स्टेशनसमोर जिथे गणपती विकायला असतात तिथे जायला निघालो आम्ही त्यावेळी गणेश पेठ पोलीस स्टेशन जवळील गाडीखाना येथे राहात होतो व काहीही खरेदी करायची असली की महाल, बुधवार बाजार येथेच जायचो माझे
वडील ऊंच होते ते भरभर चालायचे मी त्यावेळी १०/११ वर्षांचा होतो. मी त्यांच्या मागेमागे असायचो. गांधी गेट पार करून आम्ही समोर मुकुंदराय ब्रदर्स, औषधांच्या दुकानासमोरील सोसायटी क्लॉथ स्टोअर्स समोर असताना मला ५ रुपयाची नोट गंडाळी केलेली खाली रस्त्यावर पडलेली दिसली. मी ती पटकन उचलली व हातात घट्ट पकडून काका, काका (आम्ही वडिलांना काका म्हणायचो) बाबा, बाबा म्हणून वडिलांच्या मागे धावत निघालो ते माझ्यापासून १५ ते २० फुट दूर होते व भरभर चालत होते. माझ्या आवाजाने ते थांबले मी माझ्या हातातील ७५ रूपयाची गोल केलेली गुडाळलेली नोट त्यांच्याजवळ दिलो व म्हटले की त्या दुकानासमोर मला हे पैसे सापडले. माझ्या बाबांनी ती ५ रूपयाची नोट मोकळी केली तर काय आश्चर्य, ते ५ रू. नव्हतेच तर ५ रुपयाच्या ५ नोटा होत्या म्हणजे ते २५ रूपये होते. तीथे एवढी गर्दी होती की ते कोणाचे पैसे असावे है। समजायला काही मार्ग नव्हता. थोडा वेळ तीथेच थांबलो कोणी येत का पैसे शोधत म्हणून वाट पाहिली पण कोणीच आलं नाही. मग आम्ही पुढे जावून गणपती व सगळे पुजेचे सामान घेऊन घरी गेलो. सर्वांना ही २५ रूपये सापडल्याची घटना सांगितली. सगळ्यांनाच खूप कुतुहल व आश्चर्य वाटले जणू गणपती बाप्पा म्हणत आहेत. "अरे मी आहेना पाठिशी माझा खर्च मीच करतो. तू कशाला काळजी करतो."
पैसे नव्हते म्हणून त्यावर्षी गणपती बसवणार नव्हतो. परंतु गणपती बाप्पानी पैशाची व्यवस्था करून आमच्या कडून आपला उत्सव करून घेतला असे आम्हाला वाटले. त्यानंतर कधीच काही अडचण आली नाही आजही आम्ही गणपती बसवतो व आनंदाने गणेशोत्सव साजरा करतो. अशी ही गणेश चतुर्थी आमच्या सदैव स्मरणात आहे.
by:
प्रकाश अर्जुनदास देशकर
- अंबिका नगर, मानेवाडा रिंग रोड, नागपूर