चटकदार रीव्हर्स वडापाव
भाजीची कृती
प्रथम पॅनमध्ये १ टेबलस्पून तेल गरम करायला ठेवा. तेल तापले, की त्यात जिरे, मोहरी, कढीपत्ता, हिंग, लसूण, आले, हिरवी मिरची, कांदा आणि हळद घालून नीट ढवळून एक करा. कांदा लालसर झाला, की त्यात कुस्करलेला बटाटा घाला आणि मिश्रण नीट परतवत राहा. नंतर आवश्यक तेवढे मीठ घाला आणि झाकण ठेवून एक वाफ काढा. मग कोथिंबीर घाला आणि गॅस बंद करा. बेसनाचा घोळ : एका बाउलमध्ये बेसन घ्या. त्यात १/२ टीस्पून प्रत्येकी बेकिंग सोडा, हळद आणि मीठ घाला. आवश्यकतेनुसार पाणी घालून बेसनाचा घोळ तयार ठेवा. सैंडविच कृती: ब्रेड स्लाइसच्या कडा कापून घ्या आणि चार चौकोनी तुकडे करा. एका तुकड्यावर हिरवी चटणी लावा, त्यावर लाल चटणी टाका. दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवा. अशाप्रकारे सर्व सँडविच करून घ्या. आता पॅन गॅसवर गरम करायला ठेवा आणि त्यात थोडे तेल घालून पसरवा. तेल तापल्यावर सँडविच दोन्ही बाजूंनी भाजून घ्या.
कृती
वरील तयार भाजीचे गोळे करून तयार ठेवा. एक गोळा घेऊन हातावर त्याची पाती करा, पातीवर वरील सँडविच ठेवा. वरून दुसरी पाती ठेवा आणि सँडविच बटाट्यांनी नीट बंद करून हलक्या हाताने दाबा. अशाप्रकारे सर्व सँडविचचे वडे तयार करून घ्या. कढईत तळण्यासाठी मध्यम आचेवर तेल तापायला ठेवा. आता प्रत्येक वडा बेसनाच्या घोळात बुडवून तेलात तळून घ्या आणि मधून कापून चटणी, सॉसबरोबर गरम गरम सर्व्ह करा.