वय वाढलं, तुम्ही म्हातारे दिसता काय? उपाय करा सुरकुत्या : कारणे व उपाय

वय वाढल्याचं पहिलं लक्षण म्हणजे त्वचेवर पडणाऱ्या सुरकुत्या. त्यातही कोपर आणि ढोपर हे हमखास दुर्लक्षित राहतात. हा निसर्गनियम असला तरीही थोडी काळजी घेऊन व योग्य ते उपाय करून सुरकुत्या कमी करणं सहज शक्य आहे.

गुडघे व हाताचं कोपर हे दोन्ही भाग अतिशय दुर्लक्षित असतात. त्यामुळे वय वाढत तसं किंवा अतिदुर्लक्ष केल्यामुळे तरुण वयातही ते कोरडे पडतात, तिथली त्वचा जाड होते आणि सुरकुत्या पडतात. फक्त चेहऱ्याच्या सौंदर्याकडे लक्ष देण्याचे दिवस मागे सरले आहेत. आता एकंदर शरीराच्याच सौंदर्याकडे लक्ष देण्याची प्रवृत्ती दिसून येते. सामान्य लोकांपासून सेलिब्रेटींपर्यंत प्रत्येक जण चेहऱ्याबरोबरच हात, पाय, पावलं, केस अशा अवयवांकडे लक्ष देऊ लागला आहे. कित्येकदा चेहन्यावरून न दिसणारं वय हातापायांवर पडलेल्या सुरकुत्यांवरून सहज लक्षात येत. हाताचं कोपर आणि गुडघे हे दोन अवयव सर्वात जास्त दुर्लक्षित राहतात. वय वाढतं, तसं या अवयवांवर सर्वात आधी सुरकुत्या पडतात. तसंच तिथली त्वचा करपते. आणि मग वय वाढल्याची जाणीव अजूनच सतावते.

सुरकुत्यांची कारणं

वजन : वजनाचा या अवयवांच्या सुरकुत्यांशी जवळचा संबंध असतो. झटपट वजन कमी केल्यामुळे गुडघे व कोपरास सुरकुत्या पडतात.

दुर्लक्ष : या अवयवांकडे अतिदुर्लक्ष केल्याने तरुण वयातही ते रापतात व कोरडे पडतात. तिथली त्वचा जाड होते आणि सुरकुत्या पडतात.

घर्षण : कपड्यांमुळे होणारं घर्षण तसंच टेबलावर सतत कोपर ठेवल्याने टेबलाच्या पृष्ठभागाशी होणारं घर्षण यामुळे कोपराच्या त्वचेचा पोत बदलू लागतो. पर्यायाने त्वचेखालील पेशींचा लवचिकपणा कमी होतो आणि त्याचा परिणाम म्हणून सुरकुत्या पडण्यात सुरूवात होते.

आहारातील बदल : आहारात केलेले टोकाचे बदल आणि आहारातून मिळणाऱ्या कॅलरीजच प्रमाण एकदम कमी झाल्याने त्वचा सैल पडते. त्यामुळे सुरकुत्या पडतात.

सुरकुत्यांवरील उपाय

* सतत कडक उन्हात जाणं टाळावं.

* सौंदर्योपचारांच्या मदतीने नियमितपणे जुन्या त्वचेचा थर काढावा. ग्लायकॉलिक अॅसिड, लॅक्टिक अॅसिड असे घटक असलेली क्रीम्स वापरल्याने त्वचेचा पोत व रंग टिकून राहण्यास मदत होते. त्याशिवाय लिक्विड पॅराफिन किंवा शिया बटरचा समावेश असलेले मॉइश्चरायझर वापरल्यास कोपर आणि गुडघ्यांची त्वचा मऊ राहते.

* आठवड्यातून एकदा किंवा दोनदा कोपरांवर काकडी आणि पपईचा गर लावावा.

* दररोज करता येण्यासारखा उपाय हवा असल्यास कोपरावर दही अणि बेसन एकत्र करून अर्धा तास लावून ठेवावे.

* मध आणि चंदनाची पूड एकत्र करून दर दोन आठवड्यांनी हे मिश्रण लावल्यास कोपरावरची जुनी ब काळी त्वचा निघून जाते.

* पाणी कमी प्यायलं गेल्यास त्वचा तसंच इतर अवयव कोरडे पडतात. भरपूर पाण्यामुळे शरीराचं पोषण होतं आणि त्वचेमधली आर्द्रता टिकून राहते.

Comments (0)

You must login to post comments!