दिवाळीत फटाक्याचे पैसे गरीबाला दिले : थोरामोठ्यांचे बालपण
स्व. बाबासाहेब आमटे म्हणजेच लहानपणीचा मुरलीधर तो लहानपणापासूनच आई वेडा होता. आईच्या प्रत्येक कामात तो आनंदाने मदत करायचा. सारखा आईच्या मागे मागे असायचा. आईबरोबर इतर कामांप्रमाणेच तो दळणही दळू लागे म्हणून त्यांचे वडील त्यांना दळूबाई म्हणत. त्यांचा आवडता सण दिवाळी. दिवाळीची तो आतुरतेने वाट पाहात. फटाके उडविण्याची त्यांना भारी मजा वाटायची. एकवर्षी मी यावेळी फटाके आणणार असे सांगून वडिलांकडून पैसे घेऊन तो एकटाच बाजारात गेला. दुकानातील फटाके बघून त्याचे डोळे दिपले. दिव्यांच्या रोषनाईने ते आश्चर्यचकित झाला. दुकानाच्या पायरीपाशी एक भिकारी बसला होता. येणाऱ्या जाणाऱ्यांकडे आशेने दिनवाणीने भीक मागत होता. त्या भिकाऱ्याकडे त्याचे लक्ष गेले. तो आंधळा होता. हजारो रुपयांचे फटाके घेऊन लोक घरी आनंदाने जात होते. त्यांची मुले खुश होती. पण भिकाऱ्याच्या वाटीत कुणीही एक नाणं टाकले नाही. मुरलीधरचा पाय दुकानाची पायरी चढण्याआधीच मागे सरकला. त्याचा जीव कळवळला. अर्ध्या पैशाचे फटाके घ्यावे व अर्धे पैसे भिकाऱ्याला द्यावे असे मनात येताच दुसरे मन म्हणाले, फटाके उडवून शेवटी त्याचा धूरच होणार. क्षणभरच त्याचा आनंद होणार! पण हे सगळेच पैसे भिकाऱ्याला दिले तर निदान दिवाळीच्या दिवसात तरी तो पोटभर जेवू शकेल आणि क्षणार्धात त्याने ते सर्व पैसे भिकाऱ्याला देऊन टाकले. खिसा रिकामा झाला होता. पण मन
आनंदाने व समाधानाने तुडुंब भरले होते. तो अनमोल असा स्वर्गीय आनंद होता. त्यागच करायचा तर सर्वस्वाचा करायचा, अशा प्रेमळ दयावान वृत्तीचा मुरलीधर म्हणजे आ.स्व. बाबा आमटे. आजचा छोटा मुरलीधर, कुष्ठरोग्यांचा आधारस्तंभ झाला. भविष्यात सर्वस्वाचा परित्याग करून कुष्ठरोग्यांची त्यांनी मनोभावे सेवा केली. मुलांचे पाय पाळण्यात दिसतात, त्यांचे हे ज्वलंत उदाहरण आहे. त्यांना माझा सलाम. तुम्ही त्यांचे अनुकरण करा.