आमचा भुतकाळ

पन्नास वर्षापूर्वीची आहे ही गाथा
काय सांगू? कोणाला आमची व्यथा
पैसाही होता नी सोनही होतं
पण पैसा खर्च करायला जीव होत नव्हता।

चार कपड्याशिवाय पाचवा कपडा नव्हता
दोन कपडे घालायचे, अन् दोन पेटीत असायचे
सणावारालाच ते घालून मिरवायचे
उन्हाळा असो की पावसाळा असो
बाराही महिने अनवाणी पाय

थंडीमध्ये कुडकुडत लांब शाळेत पळायचे
कसलं स्वेटर नी कसलं मफलर
कपड्याच्या पिशवीत पाटी नी पुस्तकं
पाटीवर पेन्सील तर वहीवर शाईचा टाक
शाळेत बसायला नव्हते राहत बाकं

शाळेतून आल्या आल्या दप्तर कोनाड्यात जायचं
दुसऱ्या दिवशीच ते बाहेर काढायचं
अभ्यास कर म्हणून कुणी म्हणत नसायचे
मार्क्स कमी पडले कुणी रागवत नसायचे

शाळेत मात्र शिस्त होती कडक
पाढे पाठ नसले की, हातावर मिळे छड्यांचा मार
अभ्यास केला नाही तर शिक्षा मिळे फार

पण कुणीही माय-बाप फटकारायला शाळेत नाही यायचे
मागच्या दिवसाची आठवण कधी विसरणार नाही
आजच्या पिढीला ते खर वाटणार नाही
आमचाच काळ होता छान तीच होती आमची शान

by:
सौ. छाया प्रकाश कोरमोरे

- नागपूर

Comments (0)

You must login to post comments!